युवा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.
कवठेमहांकाळ दि.8 :राज्यातील महायुती सरकारने वर्षानुवर्षे बिनपगारी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक यांना त्यांच्या हक्काचे अनुदान दिल्याने या शिक्षकांनी महायुतीला भरभरून पाठिंबा दिला होता.यामुळे महायुतीच्या यशात आमचे योगदान महत्त्वाचे असल्याचे उद्गार विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी काढले.
सांगली जिल्हा संघटनेच्या वतीने काल शनिवार दिनांक ७ डिसेंबर रोजी महांकाली विद्यानिकेतन, कवठेमहांकाळ या ठिकाणी कोल्हापूर आंदोलनातील सर्व योध्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथे अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी १ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २०२४ असे तब्बल ७५ दिवस आंदोलन चालले होते.महायुती सरकारने १४ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय काढल्यावर हे आंदोलन थांबले होते.या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व लढवय्या मावळ्यांचा सन्मान सोहळा सांगली जिल्ह्याच्या वतीने आयोजित केला होता.
खंडेराव जगदाळे(सर) यांचा गौरवपत्र,शाल आणि गुलाबाचे रोप देऊन जिल्हा पदाधिकारी व उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.गौरव पत्र वाचन अध्यक्ष संदिप काळे यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना जगदाळे सर यांनी आपल्या नुकत्याच टप्पा वाढ विषयी निघालेल्या पत्राचा अर्थ सांगून कोणती कागदपत्रे तयार असावीत ते सांगितले.शिवाय सद्या २०-४०-६० % अनुदान घेत असणाऱ्या शाळांची कोणतीही तपासणी केली जाणार नाही असे सांगत जर कुणी तपासणी करत असेल तर मला सांगा असे ठणकावून सांगितले.शासन निर्णय करण्यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप सहकार्य केल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी संजय पवार,दिपक शेस्वरे,हेमंत धनवडे,संजय सरजे,संस्थापक भारत धुमाळ, दादासो बंडगर इत्यादी मान्यवरांची मनोगते झाली.
कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास २५ मावळे तसेच सांगली जिल्ह्यातील संघटनेचे सर्व राज्य,जिल्हा,तालुका पदाधिकारी आणि जिल्ह्यातील १२० अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील ३००-४०० हून जास्त शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन महांकली विद्यानिकेतन कवठेमहांकाळ चे मुख्याध्यापक बंडगरसर व स्टाफ यांनी चांगले केले होते. यावेळी सूत्रसंचालन संतोष शिंदे,प्रास्ताविक प्रमोद पाटील तर आभार शिवाजी ओलेकर यांनी मानले.
Post a Comment
0Comments