मुंबई दी.17 आझाद मैदान मुंबई येथे राज्यातील अनेक शिक्षकांच्या आयुष्यातला बराच काळ हा लढण्यामध्ये गेला. त्या वडाच्या झाडाखाली आंदोलनाच्या बाजूलाच एक वृद्ध स्त्री सदैव काही ना काही बोलत सरकारविरुद्ध भांडत उभा राहिलेली दिसायची. तिचा विषय काय आहे? इतके दिवस ती आंदोलन का करते? सर्व शिक्षक त्यांना मोकाशी मावशी म्हणायचे. इतकंच नाही तर त्या आझाद मैदानावरील प्रत्येक आंदोलन कर्त्याची त्या ओळखीच्या झाल्या होत्या.
एका निराधार स्त्रीचा अनेक वर्षे संघर्ष चालतो. हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन सुरू व उन्हाळी अधिवेशन. प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या न्याय मागणीसाठी ही निराधार महिला सदैव आंदोलन करते. शासन मात्र त्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. खरोखरच हा मुर्दाड व्यवस्थेचा बळीच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काल आझाद मैदानावर त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
मागील सव्वीस वर्षांपासून एक चेहरा कायम दिसतो. कृश शरीर, पांढरी साडी, डोक्यावर पिंजारलेले पांढरे केस, अस्वस्थ नजर, गळ्यात कागदी फलक घेऊन सुनंदा मोकाशी (वय 73 वर्षे) सरकारदरबारी हक्क मागत राहतात. निराधार म्हणून पात्र असतानाही मानधन मिळत नसल्याच्या मुद्यावरून त्या गेल्या सव्वीस वर्षांपासून सातत्याने एकाकी लढा देत आहेत.
मुंबईतील काळाचौकी येथे राहणाऱ्या सुनंदा यांच्या घराची पंधरा वर्षांपूर्वी पडझड झाली, अर्ज करूनही त्यांना कागदपत्र नाहीत म्हणून रेशनकार्ड मिळाले नाही. निराधाराचे मानधनही नाही, १९९७ मध्ये सरकारने झुणका भाकर केंद्रातील योजना आणली होती, त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र, आपल्याच गोटातल्यांना त्या केंद्रांचे वाटप करणाऱ्या सरकारने या गरीब वृद्धेची दखल घेतली नाही. सुनंदा तेव्हापासून या अन्यायाविरोधात भांडू लागल्या. मुंबईतील सम्राट हॉटेलसमोर त्यांचा पेपरस्टॉल होता, तोही हटवला गेला. त्याविरोधातही त्यांनी दाद मागितली, उपयोग मात्र शून्य. हातात पैसा नाही, पत नाही, कुणाची ओळखही नाही, तरीही सुनंदा एकहाती लढत राहिल्या. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी त्या स्वतःचाच आवाज बुलंद करत राहिल्या.
पत्रकार प्रश्नांना वाचा फोडतात, म्हणून २००९ मध्ये त्यांनी के. सी. महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवीही घेतली. वीस बावीस वर्षांच्या विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी बनून त्या मिसळून गेल्या. काही काळ पत्रकारिता केली, पण न्याय मिळाला नाही. तब्बल सव्वीस वर्षे ही सामान्य वृद्धा एकाकी लढते आहे. भकास नजरेने आपल्याकडे पाहत त्या आपल्या व्यथा नव्याने सांगू लागतात, मध्येच विचारतात, 'आज तारीख काय आहे? कोणते वर्ष आहे?' सुनंदा या व्यवस्थेने पद्धतशीररित्या संपवलेल्या एकाकी सामान्य माणसाच्या लढाईचं दुर्दैवी प्रतीक आहेत. स्वर्गीय सुनंदा मोकाशी मावशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
Post a Comment
0Comments